Wednesday 6 February 2013

Raigad | रायगड (किल्ला)

 About :

The erstwhile capital of Chathrapati Sivaji, Raigad is famed for its rich heritage, ancient monuments and rocky terrain. Literal meaning of the term Raigad is 'the king’s fort'.

Raigad, a remote locale placed at an altitude of 2851 feet above the sea level, is gifted with a mountainous terrain. Nestled in the Sahyadri mountain range, this lovely place offers breathtaking views of natural splendor. Raigad is distinguished from the nearby mountains by lovely and profound canyons. This deep gorge sprawls on an area of 1.5 kms and houses lush and lustrous vegetation. River Gandhar and River Kal flows through this beautiful valley, giving it a majestic look. A verdant valley with rivers flowing beneath makes the surroundings scenic and tranquil.

Lingana Mountain in Raigad is another favourite hot spot of tourists. Located at a height of 4,514 ft, it is one among the interesting trekking points in Raigad. Beside a center of adventurous tourism, this mountain range holds the panoramic view of the Borhatyachi Naal which is a valley lying between the Lingana and Raylingi mountains.

An ancient fort built by Sivaji is located here. It is built in order to commemorate Sivaji’s victory over Chandrarao. This gallant fort was a key figure under the Maratha regime. Though in a ruined state, this fort allures the spectators with its rich heritage.

Raigad is also famed for its varied and rich cultural heritage, folkarts like Keertan, Koli Dance, Bhajan, and Bharud are very popular among the people.

Adorned with a hilly terrain and natural foliage, Raigad’s awesome beauty gained her a prominent place in the tourism sector. Raigad’s serene, calm topography is certainly a solace to those who are coming from a busy city life











 रायगड (किल्ला) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पर्वतदुर्ग आहे.

भौगोलिक स्थान
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवाजीचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायर्‍या आहेत. इंग्रजांनी गड काबीज केल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.

इतिहास


रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’.

याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.

शिवराज्याभिषेक: शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ. स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्र प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले.१५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

१. पाचडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो अशी गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५. महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे.  महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६. चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.

७. हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८.गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

९. स्तंभ :गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

१०. पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११. मिणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

१५. नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

१७. शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.

१८. जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणेः-श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१९.महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीचमहाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ. स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

२१. वाघ दरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

२२. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.

२३. हिरकणी बुरूज : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

रायगडावरील
अश्मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्‍या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचड' असे म्हणू लागले आहेत.

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचडचा भुईकोट किल्ला, पाचड गाव व पाचडपासून ते पाचड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत एकापाठोपाठ येणार्‍या थंड वार्‍याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणार्‍याला जाणवते.

शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने (रोप वे) पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायर्‍या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे


गडावरील राहायची / खाण्याची सोय

राहण्याची व खाण्याची उत्तम सोय. एम. टी. डी. सी चे रिसॉर्ट व इतर.

गडावरील पाण्याची सोय

पाण्याचे अनेक तलाव गडावर आहेत. पाणी मुबलक.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. १. पायवाट २. रोप वे

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ

पायथ्यापासून चालत गेलात तर अंदाजे १ ते दीड तास.  रोप वे ने गेलात तर ५ मिनिटे.

* माहितीचा स्त्रोत - मराठी विकिपीडिया (Source - http://mr.wikipedia.org/wiki/ रायगड_(किल्ला) )

No comments:

Post a Comment